आधुनिक कृषि तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावे- मा. ना. प्रकाश आबिटकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे

कोल्हापूर दि. ५ – कृषि संशोधनातील कृषि शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा फायदा अधिकाधिक सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शास्त्रज्ञांनी धडाडीने प्रयत्न करावेत तसेच त्यादृष्टीने संपूर्ण कृषितंत्रज्ञानाचे धडे देणारा कृषि महोत्सव महाविद्यालयाने आयोजित करावा त्यासाठी आपले व कृषि परिषदेचे संपूर्ण सहकार्य राहील असे प्रतिपादन पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष व आमदार मा. ना. प्रकाशजी आबिटकर यांनी केले. ते आज राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे आढावा बैठकीसाठी झालेल्या भेटीदरम्यान शास्त्रज्ञ, प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालयाच्या अनुभवाधारीत शिक्षण अभ्यासक्रमाच्या विविध उपक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रदर्शनास भेट देत मा. आबिटकर यांनी या उपक्रमांचे कौतुक केले तसेच पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन पाहणी केले. भेटीदरम्यान मा.आ. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या कृषि निविष्ठा विक्री केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. या विक्री केंद्रावर महात्मा फुले कृषि विद्यापीठ तसेच कृषि महाविद्यालयामार्फत उत्पादित ऊस, सोयाबीन, भुईमूग इत्यादी पिकांचे बि- बियाणें, जिवाणूखते, मेटारायझीम सारखी हुमणी नियंत्रक बुरशी तसेच महाविद्यालयात उत्पादित विविध प्रक्रिया पदार्थ यांची विक्री करण्यात येणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन मा.आबिटकर यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी व भुदरगड सारख्या तालुक्यातील ऊस उत्पादनामध्ये एकरी 60 टनाचे उद्दिष्ट ठेवत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे तसेच अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करता याव्यात या हेतूने कमी क्षमतेचे ऊस तोडणीयंत्र विकसित करावे असेही आवाहन त्यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन व विकास समितीस सादर करण्यात आलेल्या कृषि महाविद्यालयामार्फत प्रस्तावित हायड्रोपोनिक्स प्रकल्पासाठी पाठपुरावा करत तो मंजूर करण्यात योगदान दिल्याबद्दल महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी मा. आबिटकर यांचे आभार मानले. हा प्रकल्प कृषि महाविद्यालय येथे व राधानागरी येथे राबविण्यात येणार असून त्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. या बैठकीदरम्यान महाविद्यालयाच्या शिक्षण संशोधन व विस्तार कार्याचे सादरीकरण महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सातप्पा खरबडे यांनी केले.या बैठकीसाठी उपस्थित कृषि परिषदेचे उपाध्यक्ष मा. प्रकाश आबिटकर व कृषि परिषदेचे सदस्य मा. दत्तात्रय उगले यांचे स्वागत सत्कार महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सातप्पा खरबडे यांनी केला. या प्रसंगी ऊस व गूळ संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. विद्यासागर गेडाम, शाहू कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुमार गुरव यांच्यासह महाविद्यालयाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक उपस्थित होते.